धोंडीरामसिंह ध. राजपूत

संपूर्ण महाराष्ट्रातील दवाखाने सध्या डेंग्यू (डेंगी) मलेरिया, स्वाईनफ्लू, चिकन गुनिया सारख्या आजारांनी रुग्णांच्या गर्दीने भरलेले आहेत. शासकीय रुग्णालयात तर पाय ठेवायलाही जागा नाही. दरवर्षीच ही स्थिती उद्भवते. लाखोंच्या संख्येने दरवर्षी रुग्णांना वरील आजारांची लागण होते.

निष्काळजीपणामुळे बरेच रुग्ण दगावतात. शासनाच्या आरोग्य खात्याकडून या आजारांवर कायमस्वरूपी उपाय योजना, योग्य व पुरेसे औषधोपचार होत नाहीत. रुग्णही पथ्य पाळत नाहीत यामुळे बर्‍याच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशाची यामुळे एक मोठी जनशक्ती लयास जात आहे. याबाबत गांभीर्याने कुणीही विचारात घेत नाही म्हणून या रोगांचा आपोआप प्रसार झपाट्याने दिसत आहे. संपूर्ण राज्याला वरील आजारांचा वेढा पडलेला आहे.

वातावरणातील व हवामानातील दररोज होणारे बदल, झपाट्याने वाढत असलेले पर्यावरण प्रदूषण, अशुद्ध पाणीपुरवठा, दुर्गंधीयुक्त सभोवतालची परिस्थिती, तुंबलेल्या गटारी यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्वांचा परिणाम मानवी आरोग्यावर झपाट्याने होत आहे व मानव आपले आरोग्य दिवसें-दिवस अधिक अकार्यक्षम व रोगी करीत आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया तसेच स्वाईन फ्लू हे आजार वाढत असून, मानवी जीवन दुबळे बनत चालले आहे. या आजारांवर नियंत्रण ठेवता येईल, मात्र त्यासाठी समाजातील नागरिकांनी व आरोग्य खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य सद्भाव व सामंजस्यपणाने विचार विनिमय व कृती करण्याची गरज आहे. खालील काही बाबींचे पालन व कृती केल्यास वरील आजार माणसांना शिवणार नाहीत असे वाटते.

परिसर स्वच्छता गरजेची
कोणत्याही ठिकाणची अस्वच्छता, तुंबलेले पाणी, ओला कचरा यांमुळे डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात व यामुळे हे डास नागरिकांना चावतात यामुळे डेंग्यू होतो. असे म्हणतात की ‘स्वच्छता नांदे ज्या घरी-आरोग्य तेथे वास करी’. स्वच्छता आरोग्याची किल्ली होय मग असे असताना प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्यांनी आपले घर, अंगण, परिसर, गल्ली स्वच्छ ठेवावी, गटारीत पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत:च्या घराच्या आजूबाजूला स्वच्छ ठेवले तर डासांच्या उत्पत्तीला खीळ बसेल व डेंग्यूची लागण कुणालाही होणार नाही. मात्र प्रत्येकाने स्वच्छतेबाबत आपापली जबाबदारी प्रामाणिक व अतिशय जागरूकपणे पार पाडावी.’

गटारीत, दलदलीच्या ठिकाणी कीटकनाशके टाका
पालिका, मनपा, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी आपली स्वच्छतेबाबतची जबाबदारी चोखपणे पार पाडून नागरिकांच्या आरोग्यासाठी गटारीत, दलदलीच्या ठिकाणी कीटकनाशक औषधाची किंवा पावडरची फवारणी वारंवार करावी.

डासांची उत्पत्तीची ठिकाणे कोरडी व स्वच्छ ठेवा
शक्यतो डास पाण्याच्या साठ्याच्या ठिकाणी, दमट व दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य करतो. ठेवणीच्या कपड्यांच्या ठिकाणीही त्यांचे वास्तव्य असते. साठलेले उघडे पाणी येथेही डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरात पाण्याचे साठे झाकून ठेवावेत. दलदल, ओलसर जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी. नेहमी कोरडी, स्वच्छ व साफसुथरी ठिकाणे व भांडी राहतील यांची खबरदारी घ्यावी.

स्वच्छता पाळावी
अस्वच्छतेमुळे, अस्वच्छ पाण्यामुळे जवळपास ऐंशी प्रकारचे आजार व्यक्तीस जडतात. यात मलेरिया, डेंग्यू, थंडी ताप, सर्दी पडसे अशा आजारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यासाठी हातांची स्वच्छता, कपड्यालत्त्याची स्वच्छता, परिसर स्वच्छता कटाक्षाने पाळल्यास डेंग्यूवर नियंत्रण मिळविता येईल.

भांडी, टाक्या कोरडी ठेवा
पाण्याचे भांडे किंवा पाण्याच्या टाक्या कोरड्या करून ठेवल्यास त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही व डाससुद्धा असणार नाहीत यामुळे आजारांना आळा बसेल.

जनजागृतीसाठी पुढाकार
शहरी भागातील गल्लोगल्ली व वाडीत तसेच प्रभागात व ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर जाऊन डेंग्यू, चिकन गुनियाच्या आजारांबाबत त्याच्या लक्षणांबाबत व औषधांबाबत मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर घ्यावे व जनजागृती करावी यामुळे या आजारांची भीती नष्ट होईल व नागरिक उपाययोजना करून डेंग्यूला लांब ठेवू शकतील.

मुलाबाळांची काळजी घ्या
डेंग्यू हा आजार मुला-बाळांना चटकन होऊ शकतो यासाठी त्यांची काळजी घेऊन या आजाराला दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आजार झाल्यास योग्य उपचार व योग्य औषधी घेतल्यास यापासून मुक्तही होता येते याचे भान ठेवा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा