रोहिणी हट्टंगडी यांनी दिला आठवणींना उजाळा

पुणे : एकावन्न वर्षांपूर्वी या जागेवर नाट्यगृह नव्हते. नुसतेच व्यासपीठ होते. इथे मोकळी जागा होती आणि एका बाजूला व्यासपीठ उभारले होते. माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग सुरू झाला. पहिले दोन अंक झाले आणि पावसाला सुरुवात झाली. प्रयोग बंद पडला. पहिलाच प्रयोग पूर्ण न झाल्याचे प्रचंड दु:ख झाले. हे दु:ख अनावर न झाल्याने पडद्यामागे जाऊन याच व्यासपीठावर रडले होते. मात्र आज अभिमानाने सांगते. मी जे आहे ते या नाट्यगृहामुळेच ! म्हणूनच मी या नाट्यगृहाच्या ऋणात आहे. अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आठवणींना उजाळा दिला.

भरत नाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या वतीने पहिले संगीत नाट्य संमेलनाचे उद्घाटन हट्टंगडी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, सुनील महाजन, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल आदी
उपस्थित होते.

हट्टंगडी म्हणाल्या, मंतरलेले पाणी या नाटकात मी पहिली भूमिका केली. या नाटकाचा प्रयोग याच नाट्यगृहात होत होता. मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. मात्र आज अभिमानाने उभी आहे. मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. या नाट्यगृहानेच मला कलाकार म्हणून घडविले. त्यामुळे मी नाट्यगृहाच्या कायम ऋणात असल्याची भावनाही हट्टंगडी यांनी व्यक्त केली.आनंद पानसे, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.

अन् पहिल्या प्रयोगातील मित्र भेटले
सुमारे ५१ वर्षांपूर्वी टुणटुण नगरी खणखण बाजा या नाटकाचा प्रयोग या नाट्यगृहात पार पडला होता. त्या नाटकातील काही कलाकार संगीत नाट्य संमेलनानिमित्त एकत्र आले होते. त्यात नाट्यगृहाचे अध्यक्ष आनंद पानसे, रोहिणी हट्टंगडी यांचाही समावेश होता. या सर्व कलाकारांनी एकत्र येत ५१ वर्षांच्या अतूट नाट्य मैत्रीचा धागा अधिक घट्ट केला.

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त भरत नाट्य मंदिर व संवाद पुणे आयोजित पहिले संगीत नाट्य संमेलनाचे उद्घाटन रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. आनंद पानसे, सुनील महाजन, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा