वामनराव पै

मन स्थिर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आम्ही नेहमीच सांगतो लोक ते करत नाहीत त्याला आम्ही काय करणार? खरा परमार्थ होण्यासाठी मन स्थिर झाले पाहिजे. मन स्थिर झाल्यावर मन उफराटे कसे करायचे हे सद्गुरू शिकवितात व त्याप्रमाणे मन उफराटे करा कारण मन उफराटे होत नाही तोपर्यंत ते देवाच्या चरणांपर्यंत पोहचत नाही. आपल्या हृदयांत देवाची सारखी टकटक चाललेली आहे. तो आपल्याला हाक मारतो आहे अरे माझ्याकडे बघ. नुसते बघितले तरी तुमच्यावर कृपा होईल. श्वासोच्छवासाकडे नुसते लक्ष ठेवले तरी तुमच्यावर कृपा होईल. तिथेही आपले लक्ष जात नाही. आपली सारखी बडबड चाललेली असते पण जिव्हा नांवाची गोष्ट तोंडात आहे हे आपल्या लक्षांत येत नाही. बडबड करतो ती त्याच जिव्हेच्या जोरावर. लग्नाला गेल्यावर खा खा खातो ते त्याच जिभेच्या जोरावर पण कधीही तिच्याकडे लक्ष जात नाही. लक्ष का नसते त्याचे एकच कारण देवाचे ते देणे आहे हे आपण विसरलेले आहोत. या जिभेचे इतके महत्व असूनसुध्दा आपले त्या जिभेकडे लक्ष नाही. जिभेकडे लक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. जिव्हेकडे लक्ष दिले तरी तुमचा संसार सुखाचा होईल. असोनी संसारी जिव्हे वेगू करी ज्ञानेश्वर महाराज संसार सोडायला सांगत नाहीत. संसारात रहा. संसार सोडल्यानंतर काय होते हे ज्ञानेश्वर महाराजांइतके कुणाला माहित असणार? विठ्ठलपंतांची गोष्ट सर्वशुत आहेच. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ हे जीवनविद्या सांगते आणि संतांनी पण तेच सांगितले. सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी. एकनाथ महाराजांनी सुध्दा लक्ष कुठे वेधले ते जीभेकडे वेधले. ही जिव्हा आपल्या जीवनांत फार महत्वाची आहे. ही जिव्हा म्हणजे जिब्रॉल्टर आहे. जीभ म्हणजे जिब्रॉल्टर. जिब्रॉल्टरमध्ये सुध्दा पहिली दोन अक्षरे जीभ आहेत. या जिब्रॉल्टरचे महत्व किती आहे? एक काळ असा होता की ज्याच्या हातात जिब्रॉल्टर तो युध्द जिंकणार व जगावर राज्य करणार. ब्रिटिशांनी सर्व युध्द जिंकली कारण त्यांच्या हातात जिब्रॉल्टर होता. जिब्रॉल्टर आहे कुठे? स्पेनमध्ये. जिब्रॉल्टरच्या समोर तुर्कस्तान म्हणजे समुद्राच्या पलिकडे तुर्कस्तान व अलिकडे युरोप. दोन्ही ठिकाणी संचार करायला सोपे जात होते आणि त्यांचे आरमारही स्ट्राँग होते. जिब्रॉल्टर हातात असल्यामुळे ब्रिटिशांनी जगावर कित्येक वर्षे राज्य केले! हिंदुस्थानावरच दीडशे वर्षे राज्य केले. जीवन हे युध्द आहे व हे युध्द जिंकण्याचे सामर्थ्य जिभेत आहे. इथे जिब्रॉल्टर म्हणजे जीभ आहे. ज्याने जीभ जिंकली त्याने हे युध्द जिंकले. जीभेचे महत्व लक्षांत आले की सर्व चांगले होते, सर्व सुखाचे होईल.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा