कुपोषणाची समस्या चिंताजनक

धारणी व चिखलदरा, मेळघाट या विदर्भातील भागांत वैद्यकीय सेवा सुरू करण्याचे न्यायालयीन आदेश देऊन सुद्धा वास्तवात अद्यापही तेथे वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे किंवा न्यायालयीन आदेश न पाळल्यामुळे आजही विदर्भातील कुपोषणाच्या समस्या मागील पाच वर्षांत जैसे थै आहेत त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही अशी नाराजी व्यक्त केली. या कुपोषित, आदिवासी भागांत किती डॉक्टरांनी नकार दिला याचा तपशील सरकारने न्यायालयात का सादर केला नाही? १९९६ मध्ये आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करण्याचे न्यायालयीन आदेश असताना आधुनिक रुग्णालय सुरू करण्यात दिरंगाई का? असे अनेक ताशेरे न्यायालयाने विद्यमान सरकार नसलेल्या राज्यातील सरकारी वकिलांवर ओढले आहेत. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे विदर्भातील असून गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आहेत. परंतु, विदर्भातील समस्या आहे तशीच आहे. तसेच हे खेदजनक आहे असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविणे हे खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनकच म्हणावे असेच आहे. बालमृत्यूयोजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जातो मग हे बालमृत्यू का कमी होत नाहीत? की नुसते योजनांची नावे बदलून कार्यान्वित करून अंमलबजावणी का होत नाही?

दत्तप्रसाद शिरोडकर, मुलुंड

अप्रतिम कामगिरी

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना एक डाव आणि २०२ धावांनी जिंकून क्रिकेट रसिकांना दिवाळीची गोड भेटच दिली आहे. भारतीय संघाने मालिकेतील तीनही कसोटी सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिला आहे. या तीनही सामन्यांत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताचा कसोटीतील नवा सलामीवीर रोहित शर्माने या मालिकेवर आपल्या फलंदाजीने अनोखा ठसा उमटवला आहे. पहिल्यांदाच सलामीला खेळण्याची संधी मिळालेल्या रोहित शर्माने या संधीचे सोने करीत मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक ५२९धावा काढल्या. यात त्याने एक द्विशतकही झळकवले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दि सिरीज हा पुरस्कार मिळाला. विराट कोहली व मयांक अग्रवालनेही द्विशतकी खेळी केली. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनीही आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी केली. भारताच्या गोलंदाजांनी तर या मालिकेत कमाल केली. भारताच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज टिकू शकले नाहीत. आगामी काळात भारताला आणखी कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताने जर अशीच सांघिक कामगिरी कायम राखली तर बांगलादेश वेस्ट इंडिज व इंग्लंड या देशांना नमवून भारत आपले अव्वल स्थान कायम राखेल यात शंका नाही.

श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणे

शेतकर्‍यांच्या हिताच्या निव्वळ गप्पा

यंदा पावसाने दगा दिला आहे. अद्यापही तो वर्षत आहे. त्यामुळे सर्व कृषिक्षेत्राचे अमाप नुकसान झालेले आहे. त्यामुळे सामान्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेणे परवडत नाही. धान्य पिके, भाजीपाला भिजून कृषी नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा नावीन्याच्या वस्तूंचा तुटवडा व महागाई वाढणार आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री कोणाचा यावरच कथ्याकूट सुरू आहे. सामान्य नागरिक काही करू शकत नाही. सगळे पक्षनेते आमदार-खासदार मा. पवार सुद्धा शेतकर्‍यांचा कळवळा दाखवत दौरे करतात, भाषणे देतात; परंतु एक तरी खासदार, आमदार, मंत्री मग तो कोणत्याही पक्षाचा- सरकारने मदत द्यावी म्हणून ओरड करतात का? ही सर्व मंडळी कोट्यधीश आहेत. मग ते शेतकर्‍यांना स्वतःच्या कमाईमधून का पैसे देत नाहीत? त्यांना मिळणारा सरकारी पगार आपल्या विभागातील शेतकर्‍यांना का देत नाहीत ? खरे तर आता शेतकर्‍यांनी या सर्वांना घेराव घालून मदत घ्यावी, असे त्यांचा घरावर मोर्चा धरणे धरणे, स्वतः शरद पवार कृषिमंत्री होते ते शेतकरी आहेत. मग त्यांनीच स्वतःच्या मिळकतीतून मदत जाहीर करावी व तसे इतरांना आवाहन करावे.

विकास शिंदे, सोलापूर

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा