हेमंत सोरेन मुख्यमंत्री पदाचा चेहरा

रांची : झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची महा आघाडी झाली. हेमंत सोरेन हे महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. सोरेन यांच्या नेतृत्वाखालीच महाआघाडी निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलामध्ये जागावाटप निश्चित झाले. झारखंड मुक्ती मोर्चा ४३, काँग्रेस ३१ तर राष्ट्रीय जनता दल ७ जागा लढवणार आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या वाट्याला देवघर, गोड्डा, कोडरमा, चतरा, बरकटा, छतरपूर आणि हुसैनाबाद अशा सात जागा आल्या आहेत.

महाआघाडीत बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा सहभागी झालेला नाही. सोरेन यांनी आधीच आपला पक्ष कमीत कमी ४२ ते ४३ जागा लढवेल असे स्पष्ट केले. झारखंड विधानसभेच्या ८१ जागा असून सत्ता स्थापनेसाठी ४१ जागांची आवश्यकता भासणार आहे. महाआघाडीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री रघुबर दास विरुद्ध हेमंत सोरेन असा मुकाबला रंगणार हे स्पष्ट आहे. आरपीएन सिंह यांनी रांचीत पत्रकार परिषदेत महाआघाडीची घोषणा केली. मात्र, तेजस्वी यादव अथवा राजदचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता. यावर स्पष्टीकरण देताना सोरेन यांनी तेजस्वी हे लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी रांची येथील वैद्यकीय रुग्णालयात गेल्याचे सांगितले.

आरपीएन सिंह यांनी महाआघाडीत जेएमएम आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेईल असे कोणतेही ५०-५०चे सूत्र ठरलेले नाही, असेही स्पष्ट केले.

सोरेन यांनी बुधवारी रात्री ट्विट करत सिंह हे रांचीत दाखल होईपर्यंत तेजस्वी यांच्यासमवेत जागा वाटपाला अंतिम स्वरुप दिले जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार, काल महाआघाडी घोषणा केली. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा आज (शनिवारी) पहिल्या टप्प्यातील आपले उमेदवार जाहीर करू शकतो, असे सांगितले जाते. झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणूका होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबरला तर अखेरच्या टप्प्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होईल. अन्य तीन टप्प्यातील मतदान ७, १२ आणि १६ डिसेंबर रोजी पार पडतील. तर २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा