पुणे : बाबरी मशीद व रामजन्मभूमी जमिनीच्या वादाप्रकरणी येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल काहीही असो, त्यावर समाजमाध्यमांवर किंवा कोणत्याही प्रकारे अफवा पसरू शकतात. अशावेळी, अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले. तसेच, अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले.

बाबरी मशिदी व रामजन्मभूमीच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण होणार नाही आणि कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच, समाजमाध्यमांवरील सर्व हालचालींवर सायबर शाखेचे बारीक लक्ष असून नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले.

हे टाळाच
नागरीकांनी समाजमाध्यमांवर कोणाच्याही भावना दुखावतील, असे संदेश पसरवू नयेत. तसेच, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देश्याने घोषणाबाजी किंवा जल्लोष टाळावा आणि फटाके देखील उडवू नयेत. नागरीकांनी मिरवणूका काढणे, अभिनंदनाचे फलक लावणे, जूने व आक्षेपार्ह छायाचित्र, मजकूर किंवा चित्रफिती पसरवणे यांसारखे प्रकार टाळण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. नागरीकांनी अशा प्रकारच्या सर्व समाजमाध्यमांवरील पोस्ट ब्लॉक किंवा डिलीट कराव्यात.

अशी करा तक्रार
अशा प्रकारचे संदेश पसरवणार्‍याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात 020-29710097 या क्रमांकावर संपर्क किंवा 8975953100 व 8975283100 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

कोंढवा येथे सर्वधर्मीय बैठक
महम्मद पैंगबर जयंतीनिमित्त निघणारा जुलुस आणि त्याचवेळी सर्वोच्च न्यायलायाकडून बाबरी मशिद व रामजन्मभूमीचा वादाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये सर्वधर्मीय बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यालायाच्या निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रबोधन केले. तसेच, सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशाचे पालन करणे हे कर्तव्य आसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, संजय शिंदे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सुहास बावचे, सहायक आयुक्त रविंद्र रसाळ, पोलिस निरीक्षक सी.एम. निंबाळकर, आजी माजी आमदार, नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरीकांनी पोलिसांना मदत करून कायदा व सुव्यवस्था राखणार असल्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा