पुणे : पलूस कडेगावचे आमदार व काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्या मोटारीला बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये डॉ. कदम यांच्यासह चालक व सचिवांना कोणतीही गंभीर जखम झाली नाही. मोटारीमध्ये असणार्‍या एअरबॅगमुळे कदम आणि त्यांचे सहकारी या अपघातातून वाचले. अपघातानंतर काही तासांनी डॉ. कदम हे नियोजित कार्यक्रमासाठी कराडकडे रवाना झाले.

डॉ. कदम हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहून पुण्याला येत होते. त्यावेळी बीएमसीसी महाविद्यालयाजवळील राजगड बंगल्याजवळ एक दुचाकीस्वार वेगाने त्यांच्या मोटारीला आडवा गेला. या दुचाकीस्वाराला वाचवताना त्यांची मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या धडकेनंतर मोटारीतील एअर बॅग तत्काळ उघडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, खांद्याला लागल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात मोटारीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या मोटारीला अपघात झाला आहे. मात्र, कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व चालक सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने मी सुखरूप आहे, अशी माहिती डॉ. कदम यांनी माध्यमांना दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा