मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. वाचा काय म्हणाले राऊत

शिवसेना आणि उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भूमिकेवर ठाम आहात का हे भाजपला विचारा. सेनेच्या सगळ्या आमदारांनी उद्धव यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. उद्धव जो निर्णय घेतील त्याला धरुनच पुढे जाऊ. राज्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे राज्याचे नुकसान झाले आहे. राज्याचे नेतृत्व सेनेचा मुख्यमंत्रीच करेल. महाराष्ट्राच्या जनतेची आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची हीच भावना आहे. राज्यातील मतदारही सेनेच्या मुख्यमंत्र्याची वाट पाहत आहे.

मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील वारंवार महायुतीला जनादेश मिळाला आहे हे सांगतात. मग सरकार स्थापनेचा दावा का करत नाहीत? जनादेश फक्त महायुतीला मिळाला नसून सेना भाजप यांच्या भूमिका आणि युती करताना ठरवलेल्या गोष्टींना मिळाला आहे. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. भाजप घटनात्मक पेच तयार करत आहे. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करु द्यायचं नाही. भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव घेऊन कुणी आलं तर चर्चा करु. नाहीतर शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत.

२०१४मध्ये अल्पमताचं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. कोणतेही घटनाविरोधी कृत्य, धमक्या किंवा ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. शिवसेनेच्या आमदारांना कोणत्याही सुरक्षित स्थळी ठेवलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत का प्रश्नावर बोलताना, शिवसैनिक खोटं बोलत नाही. दिलेले वचन पाळतो आणि खंजीर खुपसत नाही. हे असले शब्दांचे खेळ करायचे असतील तर मोदी आणि शहा शिवसैनिक आहेत, करताय का आमच्या पक्षात प्रवेश? असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रपती राजवटीची धमकी देत भाजप जनतेचा अपमान करत आहे. संविधान ही भाजपची जहागिर नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.

फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री : मुनगंटीवार

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा