मुंबई : शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्याचा नवा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ‘ज्यांच्याकडे बहुमताचा १४५चा आकडा आहे त्यांनी सरकार स्थापन करावे. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही, आमच्या आमदारांच्या आसपासही फिरण्याची कुणाची हिंमत नाही,’ असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना, ‘काही पक्षांतील लोकांनी आम्हाला सांगितले की, शिवसेनेच्या आमदारांना संपर्क केला जात आहे, अमिष दाखवले जात आहे. यामुळे आम्ही खबरदारी घेत आहोत. देशात अनेक राज्यांमध्ये आमदारांना फोडण्याचे काम झालेले आहे. ज्यांच्याकडे सत्ता असते, यंत्रणा असते ते लोक असे हातखंडे वापरत असतात. मात्र, स्वच्छ राज्यकारभार करण्याचे वचन देणाऱ्यांनी असले हातखंडे वापरू नयेत. राज्यात केवळ सेनेचेच काय तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही फोडण्याची कुणाची हिंमत नाही’ राऊत म्हणाले.

फडणवीसांशी व्यक्तिगत भांडण नाही
भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बनावे, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. कोणतेही व्यक्तिगत भांडण नाही. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनण्याऐवजी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावे असे आमचे म्हणणे मुळीच नाही, या सगळ्या अफवा आहेत.

सेनेकडे फक्त सत्याची चावी
शिवसेना कधी कोणताही डेडलॉक, चाव्या वगैरे ठेवत नाही. शिवसेनेकडे फक्त एकच चावी आहे. आणि ती म्हणजे सत्याची चावी.

संजय राऊत डायलॉगबाजी करत नाही
आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, संजय राऊत डायलॉगबाजी करत नाही. संजय राऊत हे शिवसेनेची भूमिका मांडत असतात. त्यांना कोणत्याही अपेक्षा नाहीत, त्यांना मुख्यमंत्रीही बनायचे नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा