मुंबई : राज्यातला सत्तासंघर्ष संपण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. बुधवारी सकाळीच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय बोलतात यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते.

काय बोलले शरद पवार?

पोलिसांच्या स्थितीबाबत
नवी दिल्लीत युनिफॉर्ममधील पोलिसाला मारहाण झाली. पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होत असून दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. देशातील अनेक राज्यात पोलिसांची अशीच अवस्था आहे. दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालावे.

शेतकऱ्यांचे प्रश्न
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे मात्र विमा कंपन्या जबाबदारी पार पडत नाहीत. त्यामुळे सरकारने बैठक घेऊन विमा कंपन्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

अयोध्या निकाल
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल जाहीर करणार आहे. निकालानंतर समाजातील कोणत्याही घटकाने निकाल आपल्या विरोधी लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्विकारण्याची गरज आहे. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. १९९२ साली उद्भवलेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये.

सत्तास्थापने बाबत
राज्यातल्या स्थितीवर काही बोलण्यासारखं नाही. राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. आघाडीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाला आहे आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडू. आमचं संख्याबळ जास्त असतं तर आम्हीच सरकार स्थापन केलं असतं. अमित शहा सरकार स्थापन करण्यात कुशल आहेत त्यांच्या कौशल्याची वाट पाहू.

संजय राऊत यांची भेट
राऊत आणि मी नेहमी भेटत असतो. राज्यसभेतील अधिवेशनासंबंधी चर्चा करण्यासाठी आम्ही भेट घेतली होती. त्यात सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा