पुणे : चक्रवादळ बुधवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा प्रभाव म्हणून शहरात सकाळपासून ताशी २० ते ३० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच दुपारनंतर मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागणार आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. घरे, वस्त्या, सोसायट्यांत पाणी शिरत असल्याने पुणेकरांची दैना होत आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आणखी दोन दिवस शहरात पावसाचा मुक्काम असेल. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाऊस आणि पाणी शिरल्याने होणार्‍या आर्थिक नुकसानीला लोकांना तोंड द्यावे लागत आहे.दोन दिवसानंतर मात्र शहर आणि परिसरातील पाऊस थांबणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.

शहरात मागील २४ तासात ३०.८ मि.मी. पाऊस पडला आहे. १ ऑक्टोबरपासून शहरात ३२२.२ मि.मी., लोहगाव येथे ३१८.६, तर पाषाण येथे ४२१.४ मि.मी. पाऊस पडला. शहरात मंगळवारी ३१.५ अंश कमाल, तर २०.८ अंश किमान तपमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस कमाल आणि किमान तपमान स्थिर असणार आहे. काल दुपारपर्यंत ऊन पडले होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण होते. मात्र रात्री उशीरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही.

मागील २४ तासांत विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.मराठवाडयात हवामान कोरडे होते. तर मध्य-महाराष्ट्राच्या काही भागातील किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. तसेच कोकण, मराठवाड्याच्या काही भागात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रात सोमवारी निर्मिती झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. हे क्षेत्र पूर्व किनारपट्टीकडे येण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तपमानात चढ-उतार होत आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मुसळधार
अरबी समुद्रातील ‘महा‘ चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. या वादळाच्या प्रभावामुळे आजपासून (बुधवारी) उत्तर कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच उद्या (गुरूवार) पर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाचा प्रभाव कायम असणार आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील पाऊस कमी होणार असल्याचे संकेत आहेत.

चक्रीवादळ उद्या गुजरात किनारपट्टीला धडकणार
चक्री वादळ मंगळवारी गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनार्‍याकडे सरसावले आहे. आज (बुधवारी) रात्री हे वादळ दीव आणि पोरबंद रदरम्यानच्या किनारपट्टीला धडकणार आहे. यावेळी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. त्यामुळे हवामान विभाागाने किनारपट्टीलगरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यालगत समुद्र खवळून अतिउंच लाटा उसळणार आहेत. तसेच पुढील दोन दिवस गुजरात, उत्तर कोकणातील डहाणू आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा