पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होत असतात. या सर्व वारकर्‍यांची प्रवासाची सोय व्हावी म्हणून, राज्य परिवहन महामंडळाने राज्याच्या विविध बस स्थानकावरून सुमारे १३०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले.जादा बस ६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार बसचे नियोजन केले जाणार आहे.

कार्तिकी एकादशी येत्या शुक्रवारी आहे. त्यानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्‍या राज्यातील भाविक प्रवाशाची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदा देखील १३०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले. या यात्रेला विशेषतः पुणे, कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची अधिक गर्दी होते. त्यामुळे पुण्यासह पाच विभागातून मुंबई ११०, रायगड १००, सिधुदुर्ग ३०, ठाणे ३०, रत्नागिरी १२० विशेष जादा बस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानका बरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था केली आहे. भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत केले.

पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३४ गाड्या
कार्तिकी एकादशीनिमित्त रेल्वे प्रशासनाने पुण्यासह विविध ठिकाणांहून ३४ रेल्वे गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, मिरज, लातूर या रेल्वे स्थानकातूनही पंढरपूरसाठी गाड्या सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-पंढरपूर, मिरज -पंढरपूर, पुणे-पंढरपूर, लातूर-पंढरपूर या गाड्यांना मार्गातील बहुतांश महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. तसेच सर्वच जादा गाड्यांना सर्व प्रकारच्या डब्याची व्यवस्थाही प्रशासनाकडून केली आहे. या गाड्याचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. या जादा गाड्यांचा लाभ वारकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा