यंदा कमी फुटले फटाके

फटाक्यांमुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत यंदा मुंबईने गेल्या पंधरा वर्षांतील नीचांक नोंदवल्याचे आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे खरेतर कौतुकच करावे लागेल. दिवाळी आणि फटाके यांचा तिळमात्र संबंध नसताना दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने देशभरात हजारो कोटींचे फटाके फोडले जातात. आवाज आणि रोषणाईमुळे मिळणारे क्षणिक सुख वगळता फटाक्यांमुळे होणारी हानीच अपरिमित आहे. दिवाळीत फटाके फोडणे ही खरेतर दिवाळीसारख्या प्रकाशमय सात्त्विक सणात शिरलेली अपप्रवृत्ती आहे. चीनहून आलेले फटाके भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फोडले जातात. यावर्षी मात्र चिनी फटाक्यांवर संक्रांत ओढवली आहे शिवाय फटाके वाजवण्याचे प्रमाणही घटले आहे, ही नक्कीच सुखावह बाब आहे.

सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई

दक्षता हवीच

पावसाळा आता परतीवर आलेला असून देखील थांबायचं नाव घेत नाही. अचानक सुरू झालेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी विविध ठिकाणी झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी वारंवार कानावर येत आहे. यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. पाऊस येत असल्यास गरज असल्यास बाहेर पडावे अन्यथा बाहेर जाणे टाळावे. अचानक पाऊस सुरू झाल्यास सुरक्षित स्थळी पोहोचावे. झाडाखाली थांबू नये. पावसासोबत रोगराई येणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते.

अश्विनी गोरे, भवानी पेठ सोलापूर.

महाराष्ट्राचा गौरव

न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले पहिले मराठमोळे व्यक्ती होते, त्यानंतर या पदावर न्यायमूर्ती बोबडे यांची नियुक्ती होत आहे. ते १८ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे ४७वे सरन्यायाधीश होतील. त्याक्षणी ४१ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात मराठी पताका फडकेल. न्यायमूर्ती बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे हा महाराष्ट्राचा गौरव आहे. न्यायमूर्ती बोबडे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. ते न्यायाधीश असताना केवळ वर्षभरात एक लाख सात हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. न्यायप्रक्रिया गतिमान करण्याचे श्रेय न्यायमूर्ती बोबडे यांनाच जाते. न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीने कोर्टाची पायरी चढण्यास धजावणारे सर्वसामान्य नागरिक मोठ्या विश्वासाने न्यायालयात दाद मागतील.

श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे

संस्कार हवेतच

बसमध्ये थोडी गर्दी आहे. एक धट्टाकट्टा तरुण नि ७५ वर्षांचा वृद्ध दोघेही उभे आहेत. एवढ्यात एक आसन रिकामे होते. धट्टाकट्टा तरुण चपळाईने ते रिकामे आसन पकडतो. वृद्ध आपला उभा तो उभाच! त्या सृदृढ तरुणाला काही असे वाटले नाही की आपण उभे राहू नि या ज्येष्ठ नागरिकाला जागा देऊ. वाईट वाटले. एकच विचार मनात आला, लहानपणापासूनच सुसंस्कार करण्याची आवश्यकता आहे.

सु. ह. जोशी, पुणे.

जनादेशाचा आदर व्हावा

निवडणुका संपल्या, निकालही लागले. युतीला मतदारांनी स्पष्ट बहुमतही दिले. जनतेने दिलेल्या जनादेशाप्रमाणे एव्हाना नव्या दमाचे, नव्या उमेदीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते मात्र ते होताना दिसत नाही. निवडणुकी पूर्वी दोन पक्षांमध्ये काय बोलणी झाली होती, काय काय ठरले होते याच्याशी जनतेला काडीमात्र रस नसतो, नसतो मानापमानाच्या गोष्टीत, किंवा रोज नव्याने वाचनात, ऐकण्यात येणार्‍या आरोप प्रत्यारोपात. सरकार स्थापनेसाठी मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले ते केवळ राज्यापुढे असलेले शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांच्या प्राथमिक समस्या, महागड्या शिक्षणाचे प्रश्न ! हे असे कितीतरी समस्या मार्गी लागव्यात, निवडणुकी दरम्यान दिलेल्या जाहीरनाम्या, वचननाम्या, संकल्पनाम्या प्रमाणे प्रश्न, समस्या सुटल्या जाव्यात या साठी. म्हणूनच सरकार स्थापन करून जनतेच्या जनादेशाचा आदर व्हावा.

विश्वनाथ पंडित, जिजामाता मार्ग, ठाणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा