पुणे : मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. हा प्रकार बालेवाडी स्टेडियम परिसरात घडला. निवृत्ती रामभाऊ घोडे (वय-30, सुसगांव) असे मृत तांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आकस्मित निधनाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मोबाईल टॉवरची मालकी असलेल्या जिओ कंपनीचे कंत्राट असलेल्या युनिसेस टेलिनिफेरा कंपनीने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

निवृत्ती यांना शनिवारी (26 ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपर्क साधून बालेवाडी येथील टॉवरमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली. त्यावरून निवृत्ती हे दुरूस्तीच्या कामासाठी बालेवाडी येथे गेले. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत ते पत्नीच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. दुसर्‍या दिवशी निवृत्ती यांच्या सहकार्‍याने त्यांच्या पत्नीशी संपर्क साधून ते टॉवरचे काम करताना बेशुद्ध पडल्याचे कळवले.

निवृत्ती यांना तत्काळ उपचार मिळाले नाहीत. परंतु, दुसर्‍या दिवशी सकाळी औंध येथील रूग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. मूळचे अमरावतीचे असलेले निवृत्ती कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, साडेतीन वर्षांचा मुलगा व एका वर्षाची मुलगी आहे.

कंपनीने नुकसान भरपाई द्यावी
दरम्यान, निवृत्ती यांच्या मृत्यूनंतर कंपनीचा एकही अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी हे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी कंपनीविरोधात रोष व्यक्त केला आहे. तसेच, कंपनीच्या अधिकार्‍यांनी निवृत्ती यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

सर्व प्रकाराचा तपास केला जाईल : अनिल शेवाळे
निवृत्ती यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी यावेळी घेतली होती. परंतु, घडलेल्या सर्व घटनेचा तपास पोलिस करणार आहेत. नातेवाईकांनी निवृत्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून, सर्व विधी पार पड़ल्यानंतर चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी नातेवाईकांना दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा