पुणे : खडकवासला मतदारसंघात महायुतीमध्ये झालेली बंडखोरी शमवण्यात वरिष्ठ पातळीवर यश प्राप्त झाले असले तरी स्थानिक पातळीवर शिवसैनिकांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात असलेली सल काढण्यात अपयश आले असल्याचे दिसून येते आहे. त्यातच प्रचारात अनुपस्थित असलेले रमेश कोंडे आणि शिवसैनिकांमुळे तिसर्‍यांदा हॅट्रीक मारण्यासाठी रिंगणात उतरलेले विद्यमान आमदार भीमराव तापकीर गॅसवर असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराची बंडखोरी आपल्या पथ्यावर पडेल, असे गृहीत धरून आमदाराविरूद्ध शड्डू ठोकत निवडणुकीसाठी सज्ज झालेले महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके जोरदार प्रचाराला फाटा देत मतांचे गणित जुळवण्याताच चिंतातूर झाले आहेत.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागा शिवसेनेला मिळतील या आशेवर शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली. त्यामध्ये हडपसर आणि खडकवासला मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या आशेवर होते. परंतु, आठही मतदारसंघ भाजपने स्वतःकडे ठेवल्याने शिवसैनिकांनी बंडखोरी करून ताकद दाखविण्यास सुरवात केली. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोंडेंच्या बंडखोरीचा फायदा करून घेण्यासाठी दोडके यांचा आनंद द्विगुणीत होत त्यांनी उत्साहात अर्ज भरला. हे बंड शमविण्यासाठी थेट मातोश्रीवरून बोलावणे आले. कोंडे यांनी मातोश्रीवर जाणे टाळले खरे! परंतु, पक्षधर्म पाळत बंड माघारी घेतले. परंतु, ज्या अपेक्षेवर दोडके होते त्या अपेक्षेवर पाणी फिरले आणि त्यांच्या चिंतेत भर पडण्यास सुरवात झाली.

तापकीर यांच्या विकासकामांचा लेखाजोखा घेतला तर स्वतः भाजपचे पारंपरिक मतदार देखील नकारात्मकता दर्शवितात. तसेच पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपच्या पारंपरिक मतदारांनी रिंगणात उतरलेल्या कांचन कुल यांना 65 हजारांचे मताधिक्य दिले खरे. परंतु, या मताधिक्यात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे येथील स्थानिक सांगतात. त्यामुळे कोंडे यांनी माघार घेतली असली तरी तापकीर यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केलेले नाही.

वास्तविक पाहता खडकवासला मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. मात्र मनसेतील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी खडकवासला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर भाजपने हीच संधी साधत पोट निवडणुकीत तापकीर यांच्यामार्फत मतदारसंघ पदरात पाडून घेतला. त्यानंतर तापकीर यांनी 2014 च्या मोदी लाटेत हात धुवून घेत विजय साकार केला.

दरम्यान विधानसभेच्या भोर मतदारसंघातून कोंडे यांचे बंधू कुलदीप कोंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यातच रमेश कोंडे हे शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख असल्याने स्वतःच्या मतदारसंघातील उमेदवार तापकीर यांच्या प्रचारात न जाता त्यांनी सर्व लक्ष भोर येथे केंद्रीत केले आहे. त्यातच अनेक शिवसैनिक नाराज असून प्रचारात जाण्यास अनुत्सूक आहेत. परिणामी तापकीर देखील प्रचारात एकाकी पडत चालले असून दोडके मतांचे गणित जुळवण्यासाठी चिंतातूर आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा