शिवाजी माळी

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत दुरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची माघार कोणाच्या पथ्यावर पडणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुमनताई आर. पाटील त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीसाठी सोपी वाटणारी लढाई शेवटच्या टप्प्यात अटीतटीची पाहायला मिळत आहे.तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघ निर्मितीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन पाटील गेली चार वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. आबांचे सुपुत्र रोहित यांनी आधीच मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या सभांना होणारी गर्दी विरोधकांची चिंता वाढवणारी होती. भाजपकडून सुरुवातीच्या काळापासून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव निश्चित मानले जात होते. मधल्या काळात अचानकपणे संजय पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांचे नाव समोर आले. त्यातच हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेला सुटला.घोरपडे यांनी शिवबंधन बांधले आणि राष्ट्रवादीच्या विरोधात धनुष्य उचलले. खासदार संजय पाटील यांनी भावनिक आवाहन करीत घोरपडे यांच्यासाठी तासगाव तालुक्यात ताकद लावली आहे. त्यामुळे घोरपडे यांना मोठे बळ मिळाले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून लढतीची तयारी करणार्‍या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळे नक्की कोणाला फायदा होणार याची गणिते आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांकडून मांडली जात आहेत.बळीराजा पक्षातर्फे बाळासाहेब पवार, तर बहुजन समाज पक्षातर्फे शंकर माने हे मैदानात उतरले आहेत. सुमनताई रावसाहेब पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. एकूण पाच उमेदवार तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रिंगणात आहेत.

‘वंचित’ची माघार कोणाच्या पथ्यावर?

असा रंगणार सामना

अजितराव घोरपडे – शिवसेना
शंकर मार्तंडा माने – बसप
सुमन आर. पाटील – राष्ट्रवादी
बाळासो पवार – बळीराजा पार्टी
सुमन पाटील – अपक्ष

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा