संजय हेब्बाळकर

सांगली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ आणि आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात खरी लढत रंगणार आहे. दरवेळेप्रमाणे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पोपट डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी बंडखोरी कायम ठेवली. यामुळे निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.

सुधीर गाडगीळ यांनी पाच वर्षांत एक हजार कोटींचा निधी विकासासाठी आणल्याचे सांगत आहेत, तर आघाडीचे उमेदवार शहरात रस्त्याची अवस्था अशी कशी? महापुरात ते कुठे होते? असे प्रश्न विचारत आहेत. ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरच रंगणार अशी शक्यता आहे. सांगलीत दुरंगी लढत असली तरी शेखर माने यांच्या उमेदवारीमुळे ट्विस्ट येणार आहे. शिवसेनेने सांगली मतदारसंघावर दावा केला होता, भाजपमध्येही बंडखोरी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ते सर्व भाजपच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. नीता केळकर, दिनकर पाटील हे दोघेही आमदारकीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने गाडगीळ यांना दुसर्‍यांदा संधी दिली. काँग्रेसकडून जयश्रीताई यांचेही नाव चर्चेत होते. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना संधी मिळाली. विशाल पाटील यांनी वसंतदादा गटाची राजकीय ताकद तुमच्या पाठीशी असे जाहीर करीत पुढच्यावेळी आमच्या आडवे येऊ नका सांगत पुढच्यावेळचे तिकीटही फायनल करून टाकले. मदनभाऊ गटाची ताकद पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी अशी घोषणा जयश्रीताई पाटील यांनी केली असली तरी प्रत्यक्षात चित्र काय असेल? हे सांगणे अवघड आहे. तीच अवस्था राष्ट्रवादीची आहे. पृथ्वीराज पाटलांना राष्ट्रवादीने बैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला छुपा पाठिंबा दिला होता, यावेळी तो भाजपला मिळणार नाही, ही पृथ्वीराज पाटील यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा