बाळासाहेब धस

अहमदनगर जिल्ह्यातील काही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत ११ विद्यमान आमदार पुन्हा नशीब आजमावत आहेत; तर तीन माजी आमदार, दोन विद्यमान नगराध्यक्ष व तीन जिल्हा परिषद सदस्य हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एका विद्यमान आमदाराने उमेदवारी म्यान केली आहे.

काँग्रेसने दोघांना तर राष्ट्रवादीने चौघांना प्रथमच संधी दिली आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच तीन जिल्हा परिषद सदस्य नशीब आजमावत असून, त्यामध्ये डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी), राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांचा त्यात समावेश आहे. दोन विद्यमान नगराध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यात राष्ट्रवादीकडून राहुरीतून प्राजक्त तनपुरे, कोपरगावमधून भाजपचे विजय वहाडणे यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीतही आमदार मोनिका राजळे, राहुल जगताप, वैभव पिचड यांनी नशीब आजमावले होते आणि ते निवडूनही आले होते. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले उमेदवार आमदार होणार का, हा औत्सुक्याचा विषय आहे. मागच्या वेळी अपयशी ठरलेले बबनराव पाचपुते, अनिल राठोड, शंकरराव गडाख पुन्हा निवडणूक लढवत आहेत. पाचपुते-भाजप, राठोड शिवसेनेचे उमेदवार असून गडाख हे प्रथमच क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून लढत आहेत. त्यांना राष्ट्रवादीने याठिकाणी उमेदवार न देता पाठिंबा दिलेला आहे. मागील निवडणुकीत कोपरगाव, नेवासे, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड, राहुरी मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले होते तर संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर या मतदारसंघांवर काँग्रेसने वर्चस्व राखले होते. राष्ट्रवादीला अकोले, श्रीगोंदे, नगर शहर, तर शिवसेनेला फक्त पारनेर मतदारसंघात विजय मिळाला होता.

भाजपने पाचही विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, प्रा. राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार वैभव पिचड, राधाकृष्ण विखे (शिर्डी) तर बबनराव पाचपुतेंना (श्रीगोंदा) पुन्हा संधी मिळाली आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार विजय औटी, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह श्रीरामपूरमधून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे व संगमनेरमधून साहेबराव नवले यांना रिंगणात उतरविले आहे.

काँग्रेसने संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरमधून लहू कानडे, शिर्डीमधून सुरेश थोरात या तिघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादीने अकोल्यातून भाजपचे विद्यमान जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, कोपरगावमधून आशुतोष काळे, राहुरीतून विद्यमान नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, शेवगाव-पाथर्डीतून अ‍ॅड. प्रताप ढाकणे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार,श्रीगोंद्यातून घनःश्याम शेलार, पारनेरमधून नीलेश लंके, तर नगर शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप, तर नेवासे मतदारसंघात उमेदवार न देता क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिला आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच पक्षांकडून राज्य व केंद्र पातळीवरील नेत्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. संगमनेर व शिर्डी मतदारसंघांत फारशी चुरस दिसून येत नसली तरी इतर मतदारसंघांत चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.

राधाकृष्ण विखे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसपुढे मोठी अडचण निर्माण झाली. काँग्रेसची प्रमुख मदार आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा