शैलेश कुलकर्णी

मानसिक स्वास्थ हे आपल्या भावनात्मक मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडित असते. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो यावर ते अवलंबून असते. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर त्याचा ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा संबंध त्या व्यक्तीच्या मानसिकतेशी निगडित असतो. आपल्या अंतर्मनातील विचारांना थोपवून धरणे तितके सोपे नसते. दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या मानसिक समस्या आणि त्यावर कराव्या लागणार्‍या उपाययोजना ह्यांचा प्राधान्याने अभ्यासपूर्वक विचार करण्याची गरज आहे.

आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत एकूणच मानसिक अस्वस्थता हा विषय गंभीर झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये सामान्य मानसिक समस्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांमध्ये नैराशाचे प्रमाण वाढत असून त्याच्या विपरीत परिणामांचे रुपांतर आत्महत्येत होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे स्वमग्नतेचे प्रमाणही प्रत्येक वयोगटात वाढत असल्याचे अनुभवास येत आहे. जवळजवळ 30% व्यक्तींमध्ये चिंता विकृती खालावली असल्याचाही अनुभव येत आहे. सुमारे 9% व्यक्तींमध्ये कंडक्ट डिसऑर्डरचे प्रमाण असल्याचे दिसून येते.

का होतात मानसिक आजार?
बदलत चाललेली जीवनशैली, राहणीमान, आवडी-निवडी, सवयी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन या सर्वच बाबींचा परिणाम एकूणच जीवनमानावर होत आहे. त्यामुळेच त्याचा थेट परिणाम मानसिकतेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेकांना भेडसावत असलेल्या काही समस्या सोशल मीडियाच्या अतिवापराने देखील निर्माण होतात.

एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्तीचा र्‍हास, आकलनशक्ती विषयीच्या समस्या, दिनचर्येतील असंबंधता, वक्तृत्व, कर्तृत्व, जबाबदारी यांची जाणीव न होणे, उग्र अथवा विरोधात्मक प्रतिक्रिया दिल्या जाणे, नकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार करत राहणे, व्यसनाधीनता निर्माण होणे, शारीरिक आजार बळावणे अशा अनेक समस्यांना मानसिक स्वास्थ बिघडल्यास सामोरे जावे लागते. त्यासह मानसिक स्वास्थ टिकवून ठेवणे शारीरिक स्वास्थाइतकेच जरूरीचे असते. शारीरिक व्यायामाला जसे प्राधान्य दिले जाते. तसेच मानसिक पातळीवरील व्यक्तिगत आयाम आणि व्यायामदेखील प्राधान्याने करणे अत्यंत जरुरीचे असते.

ब्लड प्रेशर, डायबेटिस, हार्टची दुखणी, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसीस अशी मोठी शारीरिक दुखणी होण्यामागे मानसिक अस्वस्थताच कारणीभूत असल्याचे विज्ञानाच्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकवणे आवश्यक आहे.

उपाय कोणते?
1) मानसिक स्थिरता आणि स्वास्थ प्राप्तीसाठी योगसाधना, चालण्याचा व्यायाम, संवाद साधणे, सामाजिक पातळीवर सक्रिय राहणे अत्यंत उपयुक्त ठरते.
2) आपल्या मानसिक स्वास्थ आणि आरोग्यासाठी काही पथ्यांचे पालन करणे.
3) आपल्या मानसिक तक्रारी अथवा समस्यांचे मूळ हे आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारांवर अवलंबून असते. आपण मानसिकदृष्ट्या जेव्हा थकलेले असतो, तेव्हाच शारीरिकदृष्ट्या झुकलेले असतो. आपल्या अंतर्मनाची शक्ती आणि स्थिरताच आपल्याला मानसिक स्वास्थ आणि आरोग्य देऊ शकते.
4) आपल्या पूर्ण क्षमतांची स्वत:च जाणीव करून घेणे, आत्मपरीक्षण करणे, सकारात्मक विचार करणे, कार्यशील होऊन कार्यकृती करत राहणे, जनसंपर्क वाढवणे, तणावांशी सामना करायला शिकणे, पुरेशी झोप आणि पाचक आहार घेणे, आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ राखून ठेवणे, कलेशी संबंधित कामात व्यस्त राहणे, छंद जोपासणे. अशा गोष्टी करण्याने नकारात्मकेपासून दूर राहणे शक्य होते, मानसिक स्वास्थ टिकून राहू शकते.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा