पुणे : शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातले. पावसाला सुरूवात होताच अवघ्या 10 ते 15 मिनिटांत शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने शहराची कोंडी झाली. पावसाच्या पाण्यातून नुकतंच सावरलेल्या कुटुंबांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला. पावसाच्या या रौद्र अवताराने बुधवारी पुणेकरांच्या हृदयाचा ठोका चुकवला.

आणि पाऊस सुरु झाला..
सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. त्यामुळे शहर अंधारमय झाले होते. सहा वाजता जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. अनेक भागातील वीज गेली. के.के.मार्केट, सहकारनगर, बिबवेवाडी, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन, सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल, दांगट वस्ती भागात अक्षरश: नदीसारखे पाणी वाहत होते. डेक्कन परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. वारजे-माळवाडी, वडगांव, धायरी, कात्रज, मार्केटयार्ड, अप्पर, दांडेकर पूल, कोथरूड, एरंडवणे, सातारा रस्ता, हडपसर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, वाकडेवाडी, गोखलेनगर, गावठाणात पाणी साचले होते.

का पडला इतका पाऊस ?
सुमारे दोन आठवड्यापूर्वी शहर आणि परिसराच्या आकाशात सुमारे 15 ते 20 किलोमीटर उंचीचे ढग निर्माण झाले होते. त्यामुळे शहरात ढगफुटी झाली होती. त्या पावसात सुमारे 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले. बुधवारीही शहर परिसरात सुमारे 15 किलोमीटर उंचीचे अधिक घनतेचे ढग तयार झाले होते. या ढगांमुळेच शहरात कमी कालावधीत ढग फुटीसारखा पाऊस पडला, अशी माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली.

डेक्कन परिसरात कोसळलेले झाड

पंचवीस ठिकाणी कोसळली झाडे
पावसामुळे शहर आणि उपनगरात सुमारे 20 ते 25 ठिकाणी झाडे कोसळली. तर सुमारे 30 ते 35 ठिकाणी पाणी शिरले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आली. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही भागांत फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान झाले. स. प. महाविद्यालयाजवळ पीएमपी बसवर झाड कोसळून चालकाचा मृत्यु झाला.

सातारा रोडवर अंधारातून वाट काढताना वाहनचालक

बत्ती गुल
पावसाला सुरूवात होताच अनेक भागातील वीज गायब झाली. पथदिवेही बंद पडले. सिंहगड रोड, दांडेकर पूल भागात घरगुती विजेसह पथदिवेही बंद पडल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी टॉर्चच्या सहाय्याने लोकांना वाट करुन दिली.

वाहतूक कोंडी

हजारो वाहनचालक अडकले
पाऊस उघडल्यानंतरही रस्त्यांवरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्याने सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, हडपसर रस्ता पूर्णत: ठप्प झाला होता. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी हजारो वाहनचालक अडकून पडले होते. मध्यरात्रीपर्यंत वाहणार्‍या पाण्याचा वेग कायम होता. त्यामुळे वाहन चालकांना मुठीत जीव घेऊन पाण्यातून मार्ग शोधावा लागत होता. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक वाहनांसह पाण्यात पडल्याच्याही घटना घडल्या.

माहितीअभावी गोंधळ
जोरदार पावसाला सुरूवात होताच घराबाहेर पडलेले लोक गोंधळात पडले होते. त्यातच पाऊस कधी थांबणार, वीज कधी येणार? कोणते रस्ते पाण्याखाली गेले आहेत? कोणते रस्ते वाहतुकीसाठी खुले आहेत? कोणत्या रस्त्यावर, कोणत्या चौकांत वाहतूक कोंडी झाली आहे? याची कसलीच माहिती रस्त्यांवरील लोकांना मिळत नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या लोकांचा अधिकच गोंधळ उडाला. फोनवरून ठिकठिकाणची माहिती मिळत असल्याने गोंधळात भर पडत होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा