मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द झाली होती. मुंबईतील सांताक्रूझयेथील सभेपासून ठाकरेंनी प्रचाराचा आरंभ केला. आपल्या पहिल्याच सभेत बोलताना, ‘मनसेला सत्ता नको तर प्रबळ विरोधी पक्ष बनवा ही माझी तुमच्याकडे मागणी आहे’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पुण्यातील सभेचा उल्लेख करत पावसामुळे कशी तारांबळ उडाली याचे दाखले दिले. पुण्यासारखे मोठे शहर अर्ध्या तासाच्या पावसाने बुडते? शहर नियोजन कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. मी माझ्या पुण्यातल्या सहकाऱ्यांना तुम्ही कुठे राहता असं विचारलं तर पुण्यात नाही पाण्यात राहतो असं उत्तर द्या असं सांगितलं आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

भाषणाला कमी आणि प्रवासाला जास्त वेळ लागतोय. शहरांचा विचका झाला आहे. घोटाळा झालेल्या पीएमसी बँकेचे संचालक भाजपशी संबंधित आहेत. आज राज्याला गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. जेव्हा आवाक्यात असेल तेव्हा सत्ता मागेल पण या घडीला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला साथ द्या, असं आपल्या पहिल्या सभेत ते म्हणाले. थोड्याच वेळात गोरेगाव येथे त्यांची दुसरी सभा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा