डॉ. बी. एस. दामले वारदेकर पुरस्काराचे मानकरी

पुणे : केसरी-मराठा संस्थेच्या ‘केसरी’चे माजी संपादक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकासाठी यंदा डॉ. निलिमा गुंडी यांच्या ‘स्त्रीसंवेद्य’ आणि प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांच्या ‘अभियांत्रिकीचा शिक्षक-कां आणि कसा?’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरुप आहे. ‘केसरी’चे विश्वस्त संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी या पारितोषिकाची घोषणा केली.

केसरी-मराठा संस्थेचे माजी विश्वस्त कै. रा. वी. वारदेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या पारितोषिकासाठी डॉ. बी. एस. दामले यांची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रूपये व सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी न. चिं. केळकर यांची ७२ वी पुण्यतिथी आहे. त्यादिवशी दुपारी ४ वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुकुंदनगर येथे होणार्‍या सोहळ्यात पारितोषिक वितरण होणार आहे.
स्त्री मनाचे संवेधन जाणून घेण्याच्या मध्यवर्ती सूत्राभोवती ‘स्त्रीसंवेद्य’ हे पुस्तक गुंफले आहे.१९ व्या शतकातील ताराबाई शिंदे यांच्यापासून आजच्या काळापर्यंतच्या लेखिकांच्या साहित्याचे विशेष डॉ. गुंडी यांनी यात उलगडून दाखवताना स्त्रीचे संवेदन विश्व अभिजित प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
डॉ. गुंडी यांनी मुंबईतील रूईया महाविद्यालय आणि पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात 36 वर्षे मराठीचे अध्यापन केले. काव्य, समिक्षा, ललितलेखन, बालवाड्.मय, संपादन, संशोधन अशा साहित्यातील विविध प्रकारातील त्यांचे कार्य जाणकारांकडून वाखाणले गेले. ‘आभाळाचा फळा’ आणि ‘काना-मात्रा’ या त्यांच्या बालकविता संग्रहांना राज्यशासनाचे पारितोषिक मिळाले. विख्यात समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘काव्य आणि काव्यविषयक विचार’ या प्रबंधासाठी त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे महाविद्यालय, कोपरगाव येथील संजिवनी शिक्षणसंस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुण्यातील व्ही.आय.टी. या ठिकाणी दीर्घकाळ अध्यापन केले. संजिवनी शिक्षणसंस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्ही.आय.टी.चे ते प्राचार्य होते. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. पुणे महानगरपालिकेने आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविले. अभियांत्रिकी अध्यापनाच्या क्षेत्रातील आपल्या दीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे ‘अभियांत्रिकीचा शिक्षक – का आणि कसा?‘ हे पुस्तक आहे. शिक्षकांसह धोरणकर्त्यांच्या दृष्टीनेदेखील हे पुस्तक महत्त्वाचे ठरले असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ते प्रकाशित केले आहे.
वारदेकर पारितोषिकाने गौरविले जाणारे डॉ. बी. एस. दामले गेल्या पन्नास वर्षांपासून निरामय आरोग्याचा संदेश देत योगाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. बाळासाहेब लावगनकर वैद्य यांनी स्थापन केलेल्या योग विद्या धाम या संस्थेचे कार्य डॉ. दामले यांनी आपल्या अथक प्रयत्नातून विस्तारले. योग विषयावर त्यांनी आकाशवाणीसह असंख्य शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सातत्याने व्याख्याने दिली. राज्य कामगार विमा योजनेच्या औंध येथील सरकारी रुग्णालयात त्यांनी प्रदीर्घकाळ वैद्यकीय सेवा दिली. योग प्रसारातून आरोग्य रक्षणासाठी अनेक दशके सेवाभावी वृत्तीने करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांची वारदेकर पारितोषकासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत योगावर बरेच शोधनिबंध त्यांनी सादर केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा