पॅरिस : जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेले राफेल लढाऊ विमान दसर्‍याच्या मुहूर्तावर मंगळवारी भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान स्वीकारले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतराचा सोहळा पार पडला. यावेळी हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी विमानावर ओम काढून, नारळ ठेवून पूजा केली.
राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. बार्डोक्स हवाईतळावर दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी राजनाथ यांचे स्वागत केले. त्यानंतर राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतराची औपचारिकता पार पडली.
यावेळी राजनाथ यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे सांगितले. आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्प्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला. तसेच, संरक्षण क्षेत्रासह अन्य बाबतीतही फ्रान्सकडून भारताला जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल राजनाथ यांनी आभार मानले. भारत आणि फ्रान्स हे लोकशाहीचा पुरस्कार करणारे देश असून भविष्यातही जागतिक शांतता, पर्यावरणाचे संतुलन यासह अन्य मुद्द्यांवर दोन्ही देश आग्रही राहतील, असेही राजनाथ म्हणाले.

३६ राफेल विमाने भारताला मिळणार
भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये राफेल करार झाला होता. त्यानुसार 59 हजार कोटी मोजून भारताला 36 राफेल विमाने मिळणार आहेत. यापैकी पहिले राफेल विमान काल भारताकडे सोपवण्यात आले. पुढच्यावर्षी मे महिन्यात आणखी राफेल भारताला मिळणार आहेत. राफेलच्या हस्तांतर सोहळ्याआधी राजनाथ यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

  • राफेल विमान ६० हजार फुटांपर्यंत उड्डाण करू शकते. याची इंधन क्षमता १७ हजार किलो आहे.
  • हे विमान एका मिनिटात ६० हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.
  • राफेलची मारक क्षमता ३ हजार ७०० किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज ३०० किलोमीटर आहे.
  • राफेल विमानाचा वेग २,२२३ किलोमीटर प्रति तास आहे.
  • राफेल विमान २४ हजार ५०० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते आणि ६० तासांचे अतिरिक्त उड्डाणही करु शकते.
  • मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखले जाते. तसेच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकते.
  • यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा