पारनेर, (वार्ताहर) : भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. राज्यात १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण, सरकारला त्याचे काही देणे घेणे नाही. या सरकारने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.
पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी यांच्या हितासासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडविण्याचे आवाहन पवार यांनी केले.
येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी दिलीप वळसे-पाटील होते. यावेळी माजी आमदार दादा पाटील शेळके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माधवराव लामखडे, मधुकर उचाळे, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, संभाजी रोहोकले, बाबाजी तरटे, दीपक पवार, प्रताप शेळके, सबाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
शेतकर्‍यांना आत्महत्येच्या वाटेवर नेणारे मत मागण्यासाठी आल्यावर त्यांना दारात उभे करू नका, असे सांगत एकीकडे शे-पाचशे धनिकांची 78 हजार कोटींची थकबाकी भरणारे सरकार कर्जाच्या वसुलीसाठी शेतकर्‍याच्या घरातील भांडी बाहेर काढीत असल्याची टीका करून पवार पुढे म्हणाले, युती सरकारला शेतीविषयी आस्था नाही. शेतकर्‍यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची तयारी नाही. दोन पैसे मिळू लागताच सत्ताधार्‍यांनी कांद्याची निर्यात बंद केली. हे त्यांचे शेतकर्‍यांप्रती प्रेम अशी टीका केली.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र केवळ 31 टक्के शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. तर उर्वरित 69 टक्के शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आम्ही सत्तेत असताना सरसकट 71 हजार कोटींची कर्जमाफी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. आजची पिढी सकाळ, दुपार, सायंकाळी पक्ष बदलत आहे. आपणास त्याचा फरक पडत नाही, असे सांगताना पवार यांनी सुजित झावरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिकास्त्र सोडले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा