मुंबई : मेट्रो कारशेडसाठी करण्यात आलेल्या आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ब्लॉग लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरे वृक्षतोडीसंदर्भात सेनेवर करण्यात आलेल्या आरोपांवर खासगी संकेतस्थळासाठी लिहिलेल्या ब्लॉगमधून त्यांनी भाष्य केले आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर एका रात्रीतच आरेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीला सुरुवात झाली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिकेद्वारे या प्रकरणाची दखल घेतली व वृक्षतोड थांबवण्यास सांगितली. मात्र सरकारने आवश्यक असणारी सर्व झाडे तोडल्याचे यावेळी न्यायालयात सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले
महापालिकेमध्ये जरी शिवसेना सत्तेत असली तरी मेट्रोसाठी कापण्यात आलेल्या झाडांशी सेनेचा काहीही संबंध नाही. राज्याचे पर्यावरणमंत्री शिवसेनेचे असले तरी मेट्रोसंदर्भातील एकही निर्णय राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही. ही वृक्षतोड ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)’ने केली आहे.

एमएमआरसीएलच्या हट्टीपणामागील कारण मला समजलेले नाही. लोकांशी खोटं बोलून, पर्यावरणाची हानी करुन ते विकास साधत असल्याचे सांगत आहेत.
महानगरपालिकेच्या अखत्यारीत केवळ वृक्ष समिती येते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच तज्ञांची वृक्ष समितीवर नेमणूक करण्यात आली होती. या समितीमध्ये पाच तज्ञ आणि महापालिकेतील काही सदस्यांचा समावेश आहे. फक्त शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी वृक्षतोड करण्याच्या विरोधात मतदान केले होते.

मेट्रोमध्ये कारशेड बांधण्याचा सरकारने कायमच विरोध केला आहे. २०१७ साली मुंबई महापालिकेत प्रस्तावासाठी आणण्यात आलेल्या २०३४ विकास आराखड्याला आम्ही विरोध केला होता. हाच प्रस्ताव सुधारित करुन पुन्हा मांडण्यात आला तेव्हाही आम्ही विरोध केला. वृक्षतोड करण्याच्या विरोधात आम्ही लोकसभा आणि विधानसभेत आमची भूमिका बऱ्याचदा स्पष्ट केली.

अनेकदा शिवसेनेने या निर्णयाविरोधात आंदोलनं केले. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि प्रियंका चतुर्वेदी यांना आरेविरुद्ध आंदोलन केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. आरेसाठीच्या आंदोलनामध्ये आम्ही पक्षाचे झेंडे, टोप्या घेऊन उतरलो नव्हतो मात्र इतर पक्षांनी याचा वापर केला.

आम्ही हा विषय अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला आहे. सेनेचा विकासाला विरोध नाही. मेट्रो आम्हालाही हवीच आहे. पण आरेतील कारशेडची जागा अतिरिक्त एक किलोमीटरने का वाढवण्यात आली अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरेला पर्याय उपलब्ध
आरे येथील कारशेडला नक्कीच पर्याय उपलब्ध आहेत. मेट्रो कारशेड संदर्भातील अभ्यास समितीने दिलेल्या अहवालानुसार आरे हा शेवटचा पर्याय असून येथे कारशेड बांधल्यास पर्यावरणावर परिणाम होऊन मुंबईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होईल. परंतु बॅक बे डोपो, ओशिवरा आणि कांजूरमार्ग येथे कारशेडसाठी जागा उपलब्ध आहे. मेट्रो ६ ची कारशेड कांजूरच्याच जागेवर होत आहे मात्र तेथे तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या तिप्पट वृक्षारोपण केले जाणार आहे. अशा वृक्षारोपणावर शंका असते कारण वृक्षारोपण केले किंवा वृक्ष स्थलांतरित केले तरी वृक्ष त्याच जोमाने उभे राहण्यास किमान सात वर्षांचा कालावधी लागतो.

हा प्रश्न केवळ झाडांचा नाही तर येथील जैवविविधतेचाही आहे. वृक्ष स्थलांतरित केले तरी जैवविविधतेचे स्थलांतर करता येत नाही. मी दिलेल्या प्रस्तावानुसार महानगरपालिका ६६ ठिकाणी तब्बल तीन लाख झाडे लावणार आहे. मुंबईमध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पना राबवली जाणार आहे. पण म्हणून जे आहे त्याची हानी करता कामा नये.

वृक्षतोडीला जबाबदार कोण?
मेट्रो ३ चे काम पाहणारे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या वृक्षतोडीला जबाबदार आहे. त्यांच्या हट्टीपणाचे कारण समजत नाही. पारसी अग्निमंदीर, गिरगाव पुनर्वसन व आता आरे. तिन्ही ठिकाणी मनमानी कारभार करत त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. पर्यावरणाची हानी करण्यासाठी लोकांशी खोटं बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

वाचा : ‘आरे बचाव’ला धक्का; हायकोर्टाने याचिका फेटाळल्या

त्यांना ‘पीओके’मध्ये पाठवा : आदित्य ठाकरे

न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधून आरेत वृक्षतोड

आरे वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा