पुणे : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन भाजपा उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत छत्रपती-भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे आदींचा समावेश असल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गोटात काळजीचे वातावरण पसरले आहे.

इंदापूर विधानसभेसाठी जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते. मागच्या निवडणुकीत त्यांनी भरणे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी भरणे यांनी पुढील निवडणूक तुम्ही लढा, मी निवडणूक लढवणार नसल्याचा शब्द दिला होता. मात्र भरणे यांनी शब्द फिरवून राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जगदाळे यांनीसुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासोबत छत्रपती-भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप आणि बावडा येथील हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या अशोक घोगरे यांनी सुद्धा पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्यांचे रखडलेले 14 प्रश्न जो मार्गी लावेल, त्याच पक्षाला आपला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले होते. त्यानुसार ते प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याने त्यांना पाठिंबा दिल्याचे जगदाळे यांनी मेळावा घेऊन जाहीर केले तसेच पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार असल्याची ग्वाही जगदाळे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा