मध्य वस्तीत पाऊस; आणखी चार दिवस पावसाचे

पुणे : सलग दुसर्‍या दिवशी शहरात पावसाने हजेरी लावली. उपनगरात पावसाने झोडपले, तर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या बुधवारपर्यंत शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २.५ मि.मी. आणि पाषाण येथे २.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

शनिवारी सकाळपासूनच ऊन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारपर्यंत उकाड्यातही वाढ झाली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमाराला शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली. शहरात दुपारपासून सायंकाळपर्यंत थांबून थांबून पावसाच्या सरी पडत होत्या. बावधन, चांदणी चौक, कोथरूड, वारजे-माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, नांदेडगांव, खडकवासला, धायरी, वडगांव, नर्‍हे, आंबेगाव, कात्रज परिसरात जोरदार पाऊस पडला.विशेषत: चांदणी चौक ते कात्रज हा भाग जोरदार पावसामुळे जलमय झाला होता. पावसाचा वेग इतका होता की, रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली. व्यावहार ठप्प झाले होते.

मध्य वस्तीत थांबून-थांबून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर परिसर, केळकर रस्ता, टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, हडपसर रस्ता आदींसह सर्व पेठांसह कॅम्प परिसरातही पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे मध्य वस्तीतील बहुतांश रस्त्यांवर कमी अधिक प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे दुपानंतर मध्य वस्तीतील व्यवहार ठप्प झाले. रस्त्यांवर विविध वस्तूंची तसेच खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांना पावसामुळे धावपळ करावी लागली.

शहरात काल ३१.४ अंश कमाल, तर २०.१ अंश किमान तपमानाची नोंद झाली. मागील २४ तासात शहरात ४३.८ मि.मी. पाऊस पडला. येत्या बुधवारपर्यंत शहरात ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच आज (रविवारी) गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा