पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना घेरण्यासाठी विरोधकांनी पुर्ण व्युहरचना आखली आहे. आता मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी साथ दिल्यामुळे पाटील यांच्या विरोधात मुठ बांधण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्राम्हण महासंघाने सुध्दा आपला उमेदवार उभा केला असून आता ‘आमचं ठरलंय कमळ सोडलंय’ अशा प्रकारच्या घोषणा त्यांच्याकडुन प्रचार रॅलीमध्ये देण्यात येत आहेत.

कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील यांची कोंडी करण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा एकच उमेदवार असणार आहे. पाटील यांना कोथरुडमध्ये अडकवण्याची व्युहरचना सुरुवातीपासूनच आखण्यात आली होती. निवडणूका जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदर अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात याचे संकेत दिले होते.

कोथरूडमधील इच्छुक उमेदवारांना तिकीट न देता भाजपने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच तेथे रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे अनेकजण नाराज होते. याशिवाय मनसेच्या उमेदवाराने याआधीही कोथरुडमधून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडे त्या भागात प्रबळ उमेदवारच नसल्याने त्यांची उमेदवाराबाबत चर्चा सुरू होती. मात्र भाजपमध्ये अशाप्रकारे अंतर्गत कलह सुरू असल्याने त्यांनी उमेदवार उभा न करता थेट मनसेच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

वाचा : चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्याकडे कोथरुडकरांची पाठ

चंद्रकांत पाटील यांना जेरीस आणणार : अंकुश काकडे
कोथरूड मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला होता. बाणेर-बालेवाडी भागात स्वाभिमानीचे काम आहे. सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला. परंतु त्यावेळी भाजप कोथरूडमधून कोणाला उमेदवारी देईल याची पुसटशी कल्पना नव्हती. परंतु अचानक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन आपला उमेदवार देण्याबद्दल, याविषयी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी चर्चा केली.

कोल्हापूरचे पार्सल कोल्हापूरला पाठवण्यासाठी काय करता येईल अशी चर्चा झाली. त्यातूनच एकच उमेदवार द्यावा असा विचार आला. त्यावेळी उमेदवार देण्यापेक्षा मनसेच्या शिंदे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेस नेते अभय छाजेड उपस्थित होते. शिंदे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीही विरोध केला नाही. हा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेतला आहे. दोन्ही पक्ष अतिशय जिद्दीने लढत देण्याचा प्रयत्न करू. तसेच पाटील यांना कसे जेरीस आणायचे याची रणनिती दोन दिवसांत ठरेल, असेही काकडे यांनी सांगितले. पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यात येणे हेच योग्य नव्हते. त्यांच्या विरोधात कोथरूडकरांची जी प्रतिक्रिया उमटली आहे ती सर्वांनी पाहिली आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार उभा करण्यापेक्षा मनसेलाच पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही एकत्रित घेतल्याचे छाजेड म्हणाले.

वाचा : चंद्रकांत पाटलांच्या प्रचाराला मजूर अड्यावरील कामगार

ब्राम्हण महासंघाकडून महेश आरगडे
आमचं ठरलंय कमळ सोडलंय, अस म्हणत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देखील कोथरूडमधुन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांसमोर आता आणखी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून ‘परत जा, परत जा, चंदूदादा परत जा, भाडोत्री उमेदवार चालणार नाही, आमचं ठरलंय कमळ सोडलंय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

तीन मिनिटांचा उशीर आणि उमेदवारीची संधी हुकली

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा