मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
टांगावाले कॉलनी परिसरात चारही बाजूने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाणी शिरले. तेव्हा पत्नी व दोन मुलांसह नातेवाईकांकडे निघालेल्या जगन्नाथ सदावर यांना नियतीने मोठा धक्का दिला. पत्नीकडे व स्वतःकडे मुलाला घेऊन सदावर कुटुंबीय निघाले होते. त्यावेळी घराची भिंत कोसळत असल्याचे दिसताच, लहान मुलाला तत्काळ बाहेर फेकले. त्यानंतर मोठ्या मुलाला व पत्नीला हात द्यायला निघालेल्या सदावर यांच्यासमोरच पत्नी व मुलावर भिंत कोसळली व त्यांचा मृत्यू झाला. श्रीतेज व जान्हवी सदावर यांच्या अशा प्रकारे जाण्यामुळे सदावर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

श्रीतेज व जान्हवी सदावर

पंधरा मिनिटांत येतो म्हणणारे बाबा आलेच नाहीत
मुलगा कौशल याला फोन करून दहा मिनिटांत घरी येतो असे सांगणारे महापालिकेचे ठेकेदार किशोर गिरमे मोटारीने घरी निघाले. मोटारीतून घरी जाण्यासाठी निघालेले गिरमे हे धायरी पुलाखाली वाहतूक कोंडीमध्ये अडकले. त्यावेळी पाण्याच्या आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे ते मोटारीसह वाहून गेले. त्यांची मोटार गुरूवारी सकाळी सापडली. परंतु, त्यांचा मोटारीत गुदमरून मृत्यू झाला होता. बाबांनी लवकर येणार असल्याचे सांगूनही ते बराच वेळ न आल्यामुळे कौशलने पुन्हा गिरमे यांना फोन केला. त्यानंतर परिसरात गिरमे यांचा शोध घेतला. आठ तास शोध घेतल्यानंतर पासलकर पुलाखाली पाण्यात गिरमे यांची मोटार सापडली. त्यावेळी सीटबेल्टला गिरमे यांचा मृतदेह दिसला.

किशोर गिरमे

श्वानावरील प्रेमापोटी गमावला जीव
टांगेवाला कॉलनीला पावसाने वेढल्यानंतर सर्व नागरिक वेगाने वस्ती सोडून चालले होते. त्यावेळी बाहेर पडलेल्या रोहित आमले याला काही अंतर पुढे आल्यावर आपल्याकडील श्वानाचे पिल्लू घरातच राहिल्याचे समजले. त्यामुळे या पिल्लाला आणण्यासाठी रोहित गेला आणि काळाने डाव साधला. रोहितचे मामा तेजस अनावकर व आजी यांच्यासह सर्व कुटुंब पावसामुळे घराबाहेर पडले. तेवढ्यात रोहित याने घरात पिल्लू राहिले असून, त्याला आणायला जात असल्याचे अनावकर यांना सांगितले. त्यावेळी अनावकर यांनी जाण्यास नकार देऊनही रोहित हा आलोच असे म्हणून पिल्लाला आणण्यासाठी आत गेला. हे पिल्लू घेऊन बाहेर येत असताना, त्याच्यावर भिंत कोसळली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे रोहितचे मामा तेजस अनावकर यांनी सांगितले. रोहित लहान असतानाच, त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे अनावकर यांच्याकडेच रोहित राहत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

रोहित आमले

दुचाकीसह वाहून गेलेल्या अमृता यांचा मृत्यू
नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जात होत्या. परंतु, पाण्याच्या प्रवाहामुळे त्या दुचाकीसह वाहून गेल्या. नेहमीप्रमाणे अमृता या सायंकाळी साडेदहापर्यंत घरी पोहचणे अपेक्षित होते. परंतु, अमृता घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर सिंहगड पोलिसांना याबाबतची खबर दिली. पोलिसांनी केलेल्या आठ तासांच्या शोधकार्यानंतर अमृता या ‘सनसिटी’च्या बाजूला असलेल्या मैदानावर मृतावस्थेत आढळल्या. अमृता यांच्यामागे दोन मुली असून, पती मुंबई येथे कामानिमित्त असतात.

अमृता आनंद सुदामे

यांनी गमावला जीव
रोहित भरत आमले (वय-13), संतोष कदम (वय-55), श्रीतेज सदावर (वय-9), जान्हवी जगन्नाथ सदावर (वय-35), लक्ष्मीबाई पवार (वय-70), ज्योत्स्ना राणे (वय-30, सर्व रा. टांगेवाला कॉलनी), किशोर दत्तात्रय गिरमे (वय-55, नांदेड सिटी), गजराबाई सुदाम खोमणे (वय-70), छकुली सुदाम खोमणे (वय-30, दोघी रा. पुरंदर), गौरी शाम सुर्यवंशी, आरती शाम सुर्यवंशी, शाम रामलाल सुर्यवंशी, मच्छिंद्र पांडुरंग बनवले, सुमन अजिनाथ शिंदे (वय-65), वंदना अतितकर (वय-55, दत्तवाडी), अमृता सुदामे (वय-37, सिंहगड रोड)

बेपत्ता नागरिक
व्हिक्टर आँगस्टिन सांगळे (वय-26), साईनाथ सोपान भालेराव, निखील दिनेश चव्हाण (वय-21), साईनाथ ऊर्फ गणेश तुकाराम शिंदे (वय-22) आणि सुरज ऊर्फ बाबू संदिप वाडकर (वय-20, सर्व रा. संतोषनगर कात्रज), धर्मनाथ कुमार भारती (कोंढवा).

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा