राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पुणे: पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या पालकत्वाच्या काळातच पुणे महापालिकेत सर्वाधिक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आता ते प्रशासन आणि पदाधिकार्‍यांची खरडपट्टी करत आहेत याला अर्थ नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे महापालिकेतील काही पदाधिकारी प्रशासनाला चुकीची कामे करण्यासाठी दबाव आणत आहेत, अशी कबुली प्रशासनाकडून देण्यात येत आहे. महापालिकेमध्ये आणि रस्त्यावरसुद्धा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आणली आहेत. पुण्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी पालकमंत्री असताना कोणतीच कारवाई केली नाही. जलपर्णी, जायका, मैलापाणी प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यहार आहे. पालिकेतील काही पदाधिकारी प्रशासनावर चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकतात. निविदा मान्य करण्यासाठी नगरसेवक आणि पदाधिकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकतात. यामुळे पुणेकरांचे पैसे वाया जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

यावेळी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, महिला काँग्रेस आणि युवती काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या, तीन महिन्यांपूर्वीचे पालकमंत्री आणि आत्ताचे खासदार बापट यांनी तेव्हा काहीच केले नाही. पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नसल्याचे चव्हाण म्हणाल्या.

याविषयी शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. पुणे महापालिकेत सत्तेत येऊन अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी एकही प्रकल्प पूर्ण होवू शकलेला नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कोणी नाव काढायला तयार नाही अशी बिकट अवस्था पुणेकरांची आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा