पुणे : यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 20 गुणांची तरतूद केली आहे. या निर्णयाचे आदेश बोर्डाच्या सर्व अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गुण देण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांनी आवश्यक प्रकल्प किंवा प्रात्यक्षिके पूर्ण करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाने यामध्ये बदल केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

आशिष शेलार म्हणाले, नववीचा कोणताही अभ्यासक्रम 10 वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला नाही. विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेला आनंदाने आणि कोणतेही दडपण न घेता सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बदललेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप समजून घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, तर दहावीची परीक्षा अधिक सोपी असल्याचे आपल्याला जाणवेल. यंदाच्या परीक्षेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर शासनाने त्यावर विचार विनिमय करून, प्रात्यक्षिक परीक्षांत 20 गुणांची तरतूद केली आहे. त्याचा येणार्‍या वर्षात मुलांना नक्की फायदा होईल. राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा, तसेच पाण्याच्या टंचाईचा प्रश्न विद्यार्थिदशेपासून समजावा, यासाठी शासनाने जलसुरक्षा, जलशक्ती हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजेल आणि भविष्यात येणार्‍या जलसंकटावर मात करू शकतील.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रात शेलार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, सुपरमाईंड फाऊंडेशनच्या संचालिका मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, रोटरी क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रवी धोत्रे, रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष राहुल गडकरी, श्रीकांत जोशी, डॉ. विशाल घुले, अलोका काळे, अमेय जोग, ऋषिकेश कुलकर्णी, तृप्ती नानल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात 102 शाळांमधून 6000 विद्यार्थी व 100 हून अधिक शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. अर्चिता मडके यांनी सूत्रसंचलन केले. दीपा बडवे यांनी आभार मानले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा