नवी दिल्ली : कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा कडक बंदोबस्त आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपवर टीका केली असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो,स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असे आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञअसल्याचे म्हटले.

आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिले.

राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा.परिस्थितीचा आढावा घ्यावा.त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो,असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चालू आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असे आव्हान राहुल यांनी दिले होते. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिले होते.सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम ३७० हटवलेले नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधाने तुम्हाला शोभत नाहीत,असे मलिक म्हणाले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकता दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा