अर्था अर्थी – महेश देशपांडे

शेअर बाजारात पडझड सुरू झाली की गुंतवणूकदार धास्तावतात. सध्या सुरू असलेली शेअर बाजार निर्देशांकाची पडझड पाहता ते साहजिकही आहे. मात्र भीती आणि मोह या दोन गोष्टी दूर ठेवूनच गुंतवणूक करणं हे शेअर बाजाराचं प्राथमिक सूत्र आहे.

जास्त परतावे किंवा जास्त नफा मिळवायचा असेल तर शेअर बाजारातल्या गुंतवणुकीला पर्याय नाही. बँकांचे व्याजदर घसरत चालले आहेत. मुदत ठेवींवरील व्याजही कमी होत चाललं आहे. त्यामुळे महागाई दरवाढीचा विचार करता हे परतावे अत्यल्प वाटावेत एवढे कमी झाले आहेत. साहजिकच गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराकडे आशेनं पहात आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये शेअर बाजार त्यांचा भ्रमनिरास व्हावा एवढा घसरला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच निफ्टीची गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 2100 अंशांनी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही सहा टक्क्यांनी घसरला; गेल्या महिन्याच्या तुलनेत त्याची सुमारे 2200 अंशांनी घसरण झाली आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र बाजारातली गुंतवणूक काढून घेणं हा त्यावरचा पर्याय नव्हे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अशा वेळी अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती घसरलेल्या असतात. त्यात केलेली गुंतणूक भविष्यात भरपूर फायदा मिळवून देणारी ठरू शकते.मात्र त्यासाठी काही पथ्यं जरूर पाळावी लागतात. शेअर बाजारात किंवा अगदी म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करण्यात जोखमी असतातच. म्हणूनच नफ्याच्या आशेनं पोर्टफोलिओतली भरपूर रक्कम या गुंतवणुकींमध्ये गुंतवणं धोक्याचं असतं. योग्य प्रकारे पोर्टफोलिओ तयार करणं महत्त्वाचं असतं आणि तो करताना आपलं वय, गरजा आणि त्याबरोबरच आपल्याला किती मुदतीसाठी आणि कोणत्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करायची आहे याचा विचार करून शेअर बाजारात किती रक्कम गुंतवावी याचा आकडा निश्चित करावा लागतो.

शक्यतो कंपन्यांच्या मागील दोन ते तीन तिमाहींमधल्या कामगिरीचा अंदाज घेऊन शेअर्सची निवड करणं केव्हाही योग्य ठरतं. सध्या शेअर्स गडगडल्याचं दिसलं तरी त्यांच्या कामगिरीचा असा अंदाज घेतला तर तो त्यांच्या निवडीसाठी मार्गदर्शक ठरतो. त्यातही बाजारातली गुंतवणूक जोखमीची असली तरी धोकादायक नसल्याचं जाणकार सांगत आहेत. कारण बाजारात होणारी अशी पडझड हे अर्थव्यवस्थेतल्या पडझडीचं लक्षण असतं, असं सर्वसामान्यपणे मानलं जात असलं तरी भारताच्या शेअर बाजारांच्या बाबतीत हे खरं नाही. भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. मग ही पडझड का झाली असा विचार करता काही कारणं असल्याचं दिसतं.

शेअर बाजार प्रामुख्यानं सेंटिमेंट्स म्हणजे भावना आणि लिक्विडिटी किंवा तरलता यावर अवलंबून असतो. या दोन्ही बाबी सध्या नकारात्मक आहेत. देशपातळीवरच्या काही कंपन्यांची कामगिरी फारशी चांगली नाही. ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांपासून कंपन्यांपर्यंत सगळेजण तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत आहेत. साहजिकच अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थातच ऑनलाईन स्टार्ट अपमुळे काही प्रमाणात रोजगार निर्माणही झाले आहेत. मात्र त्याचं प्रमाण कमी आहे. रिअल इस्टेटमध्ये गेली तीन वर्षं मंदी आहे. अनेक प्रकारच्या सवलती देऊनही अनेक ठिकाणी जागा आणि तयार फ्लॅट व बंगले पडून आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याबरोबरच वाहन व्यवसायातही मंदी आहे. या दोन्ही क्षेत्रांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो.

अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी सरकारनं काही नवीन कायदे केले आहेत. त्याद्वारे कर आकारणी केली जात आहे. त्यात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवर कर बसवण्यात आला आहे. यालाच एफपीआय कर असं म्हटलं जातं. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये परकी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 79 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु एका जुलै महिन्यातच त्यांनी 12 हजार कोटी रुपये बाजारातून काढून घेतले. त्यामागे हे प्रमुख कारण आहे. अंदाजपत्रकात अति श्रीमंतांवर कर लादण्यात आला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआरच्या अटींची पूर्तता योग्य प्रकारे न केल्यास कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. आणखी एका कायद्यान्वये प्रवर्तकांच्या शेअर भांडवलावर 65 टक्के कमाल मर्यादा लागू करण्यात आली आहे. साहजिकच याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे.

या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन परिणामांना तोंड देण्यासाठी आणि त्यानुसार गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी उद्योगक्षेत्राला आणि गुंतवणूकदारांना काही वेळ जरूर लागणार आहे. तोपर्यंत ही घसरण होणं स्वाभाविक आहे. मात्र अशा प्रकारची घसरण पहिल्यांदा झालेली नाही. 2016 पासून तीन वेळा अशा मोठ्या घसरणी झाल्या आहेत. परंतु दर वेळी घसरण झाली की मग निफ्टी त्या घसरणीला पायाभूत आधार पातळी मानून वधारू लागतो, असा तज्ज्ञांचा अनुभव आहे. सध्याची ही आधार पातळी सर्वसामान्यपणे 10,850 ते 10,600 च्या दरम्यान आहे. त्यामुळे आता निर्देशांक वधारू लागेल अशी चिन्हं आहेत. अर्थातच तो लगेच वधारणार नाही. त्याआधी तो आपला पाया अधिक व्यापक आणि बळकट करेल. त्यामुळे आणखी काही दिवस घसरण दिसली तरी घाबरून न जाता गुंतवणूक सुरू ठेवावी, असा सल्ला दिला जात आहे.

बाजारात अल्पकालीन गुंतवणूक करू इच्छिणार्‍यांना तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून त्यांनी आपल्या गुंतवणुकीची मुदत वाढवणं आवश्यक आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक करणार्‍यांसाठी ही मोठीच संधी आहे. या काळात अद्याप शेअर बाजारात प्रवेश न करणारेही नव्या सुरुवातीचा निर्णय घेऊ शकतील. कारण सध्या अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घसरलेल्या भावात खरेदी करणं शक्य आहे. भविष्यात ते वधारतील त्यावेळी मोठा नफा कमावता येईल. शिवाय ज्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी आपली गुंतवणूक वाढवण्यासही हरकत नाही. मात्र एसआयपी किंवा एसटीपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू असेल तर ती काढून घेण्याचा विचार योग्य ठरणार नाही. अनेकजण असा विचार करतात. पण, त्यामागे विचारीपणापेक्षा घबराटच मोठ्या प्रमाणात असते. एसआयपीद्वारे दर महिन्यात थोडी, थोडी रक्कम गुंतवली जाते. सध्याच्या काळात तुम्ही तेवढ्याच रकमेत अधिक शेअर्स खरेदी करू शकाल. त्यामुळे ही रक्कम वाढवण्यासही हरकत नाही.

बाजार जसा चढतो तसा घसरतो आणि कालांतरानं जसा घसरतो तसा चढतोही. त्यामुळे किमान पाच वर्षांसाठी किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातून चांगल्या कंपन्यांच्या फंडांची निवड केली असेल तर अंतिमतः फायदा मिळतो. मात्र बाजारात तेजी किंवा मंदी असते त्यावेळी आपल्या पोर्टफोलिओचा जरूर आढावा घेतला पाहिजे. त्याचबरोबर कंपन्यांच्या कामगिरीवर सातत्यानं लक्ष ठेवलं पाहिजे. सलग वर्ष-दीड वर्षं चांगली कामगिरी न करणार्‍या कंपन्यांचे शेअर्स शक्यतो ठेवू नयेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा