पुणे : राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून, प्राथमिक अंदाजानुसार तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या फळबागांच्या उभारणीसाठी पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

पुणे विभागातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन याचा आढावा कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने यामध्ये फळबागांचा समावेश आहे. या फळबागांची पुन्हा उभारणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये द्राक्ष पिकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब शेतकर्‍यांनी करण्यासाठी ठिबक सिंचनावरील शेतीला ८० टक्के सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. नक्षलग्रस्त तालुके, कायम दुष्काळी तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांचा समावेश त्यामध्ये आहे, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

मागेल त्याला शेततळे योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे. उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही शेततळ्यांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठीही प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. काजू उत्पादनाबाबत नेमलेल्या समितीने अहवाल दिला असून, तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. या अहवालानुसार कोकणात काजू उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा