आगार, बसस्थानकातील मालमत्तेचेही नुकसान

पुणे : मागील काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी एसटी प्रशासनाला बसच्या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळेच मागील दहा दिवसांपासून एसटीला रोज 4 ते 5 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याने अतिवृष्टीने एसटीची आर्थिक कोंडी केली आहे.

राज्यात मराठवाडा वगळता उर्वरित भागात कोसळणार्‍या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे एसटीच्या अनेक भागांतील फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीला दैनंदिन 4 ते 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक आगार, बसस्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अद्यापही काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने पुणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, कोकणातील काही तालुके तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांतील आगारात बस थांबून आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस आर्थिक नुकसानीचा आकडा वाढत चालला आहे.

एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. यातून सरासरी 22 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र मागील 10 दिवसांपासून दररोज एसटीच्या किमान 10 लाख किलोमीटरच्या बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून या विभागाच्या 12 आगारातून वाहतूक होऊ शकली नाही. सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये ही स्थिती आहे.

महाराष्ट्र राज्यात मराठवाडा वगळता सर्वदूर गेल्या दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. जोरदार पावसाने राज्यातील काही भागांत एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. फेर्‍या रद्दमुळे गेल्या 10 दिवसांत एसटीचा 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तसेच, अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा