पुणे – ’सत्तरीच्या साधनेत ही अत्तरी’ म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल, अशा खास आणि सातारी शैलीत भाषणाला सुरवात करून ’गावच्या पाटलाला कौतुक नाही वाटणार.. तर कोणाला!’ असे उद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढत नेहमीसारखी उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली. निमित्त होते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे! या पुरस्काराने गौरविण्यात आलेले भारत फोर्ज लि. कंपनीचे संस्थापक बाबा कल्याणी कराडचेच! तोच संदर्भ पाटील यांच्या भाषणात होता.

पाटील म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी ’स्वदेशी’ची संकल्पना मांडली, ती कल्याणी यांनी त्यांच्या नावाला शोभेल अशीच तडीस नेली. कारण त्यांच्या नावातच ’कल्याण’ आहे, असे म्हणतानाच आम्ही दोघे एकाच गावचे. मीदेखील सत्तरी पूर्ण केली आहे?आणि त्यांचीही सत्तरी झाली असून, कल्याणी यांनी या वयातही सामाजिक बांधिलकीची साधना अविरत जोपासली आहे.

देशातला पैसा देशातच राहावा आणि तरुणांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी प्रथम स्वदेशीची संकल्पना मांडली?आणि भारतातच लघुउद्योग निर्माण केले. त्याच लघुउद्योगांचा वटवृक्ष वाढवून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरवला आहे. त्यासाठी समाजाचीदेखील मोठी मदत मिळाली आहे. म्हणून आपण कुठेतरी समाजाचे देणे लागतो, या बांधिलकीतून कल्याणी यांनी क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत, असे सांगताना सत्तरीच्या वयातही पुन्हा पाठीवर थाप मिळवून घेण्यासाठी काम करावे, अशी कोपरखळी घेताच सभागृहात एकच हशा पिकला.

अचूक लक्ष्य भेदणार्‍या बंदुकीची चाचणी सुरु
भारत फोर्ज लि. कंपनीच्या वतीने संरक्षणासाठी स्वदेशी बनावटीचे शस्त्र निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बर्फाळ प्रदेशात दूरवरूनही अचूक लक्ष्य भेदणार्‍या बंदुकीची चाचणी सुरू असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा