विनय पुराणिक

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पक्षांत खलबते सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षाने पक्षाची मुलतत्वे, परंपरा, विचार वेशीबाहेर टांगून पक्षात मेगाभरती सुरु केली तरी युती अभेद्य राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सद्य स्थितीतील मेगाभरती पाहता ’युती शिवाय आपले सरकार’ असाच भाजपचा मानस असल्याचे एकंदरीत वातावरण दिसून येते.

मागील पाच वर्षांपूर्वी सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेसमुक्त सरकार अशा आवेशात भाजपने प्रचार केला. २०१४ मध्ये मित्र पक्ष वेगवेगळे लढले. परंतु, स्वबळासाठी मित्र पक्षाची मदत घेऊन युतीचे मनोमिलन झाले. दोन वर्षाच्या कालावधीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशात राजीनामे घेऊन फिरण्यास सुरवात करताच संधीसाधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (एनसीपी) नेत्यांनी मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले. परंतु, शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशातच विरले. त्याचाच कडता काढण्यासाठी भाजपने यंदा स्पष्ट बहुमताचे सरकार (युती शिवाय) आणण्याचा चंग बाधला आहे.

नुकतीच भाजपमध्ये मेगा?भरती झाली. वनमंत्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. मुनगंटीवार म्हणाले, पिचड गेल्या अनेक दिवसांपासून माझा पक्षप्रवेश कधी करून घेणार? असे प्रश्न विचारत परंतु, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कुठला धागा बांधण्याची गरज नाही अथवा कोणते बंधन नाही, असा टोला शिवसेनेचे नाव न घेता लगावला. त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युती अभेद्य राहणार असल्याचे सांगत उपस्थितांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत वेळ मारून नेली.

हे झाले बोलण्याचे, परंतु, भाजप ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांची आयात करत आहे, त्या आयात उमेदवारांच्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना ही दुसर्‍या क्रमांकावर आहे. अकोले, एरोली, बार्शी, वडाळा येथील विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी भाजपमध्ये आपले ’संस्थान खालसा’ केले. असे अनेक विधानसभा मतदारसंघातील दिग्गज मार्गावर असून तेथे शिवसेना वरचढ आहे.

अहमदनगर अकोले विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या वैभव पिचड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. याच ठिकाणी शिवसेनेचे मधुकर तलपडे हे दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार मानले जातात. त्यांचा जनमानस मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, सत्ताधारी पक्ष आणि त्यातच पिचड कुटुंबाला लाभलेला राजकीय वारसा पाहता या जागेवर भाजप दावा करू शकते. एरोली मतदारसंघात देखील विद्यमान आमदार संदिप नाईक भाजपमध्ये दाखल झाले असून या?ठिकाणी शिवसेनेचे विजय चौगुले वर्चस्व राखून आहेत.

बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे देखील भाजपच्या गोटात सामील होण्यास तयार आहेत. बार्शी मतदारसंघात देखील शिवसेना वरचढ असून या ठिकाणी शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांनी पक्षाकडून आदेश आल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरु केली आहे. मागील निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा